हिमायतनगर | देवानंद गुंडेकर सरसमकर
हिमायतनगर तालुक्यातील मौजे बळीराम तांडा ग्रामपंचायतीअंतर्गत विविध विकासकामांच्या निधीमध्ये कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते विशाल राठोड यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
विशाल राठोड यांनी दिलेल्या निवेदनानुसार, बळीराम तांडा येथील कचरा व्यवस्थापन शेडसाठी मंजूर झालेला निधी, बंदिस्त नाली बांधकामासाठी प्राप्त निधी, तसेच पोटा तांडा येथील शाळा दुरुस्ती आणि अंगणवाडी दुरुस्तीसाठी मंजूर झालेला निधी परस्पर उचलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित कामे प्रत्यक्षात पूर्ण न करता अथवा अपूर्ण अवस्थेत असतानाही निधी खर्च दाखविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून निधीच्या खर्चाचा तपशील सार्वजनिक करावा, तसेच दोषी आढळणाऱ्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विशाल राठोड यांनी केली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या आरोपांमुळे परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. विकासकामांसाठी मंजूर झालेला निधी नेमका कुठे खर्च झाला, याची चौकशी होऊन सत्य समोर यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत ग्रामपंचायत प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, प्रशासनाकडून चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. संबंधित प्रकरणाची दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने तपास करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे
