हिमायतनगर :- देवानंद गुंडेकर सरसमकर
हिमायतनगर तालुक्यातील मौजे जवळगाव वर्तुळाचे नवनियुक्त मंडळ अधिकारी मनोज विठ्ठलराव खंदारे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
मनोज खंदारे यांनी यापूर्वीही हिमायतनगर तालुक्यातील सरसम बु सजा येथे तलाठी म्हणून कार्यरत असताना आपल्या कार्यक्षम, लोकाभिमुख आणि जनतेच्या समस्यांबाबत तत्पर भूमिकेमुळे विशेष ओळख निर्माण केली होती. प्रशासनातील पारदर्शकता, जनतेशी सुसंवाद आणि कर्तव्यदक्ष कामकाज यामुळे त्यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.
भोकर तालुक्यातून बदली होऊन ते पुन्हा हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव वर्तुळात मंडळ अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. त्यांच्या पुनरागमनामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून महसूल विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावेळी नागोराव शिंदे (डिजिटल मीडिया तालुका अध्यक्ष), देवानंद गुंडेकर (नांदेड जिल्हाध्यक्ष, राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र राज्य) तसेच गंगाधर गायकवाड दिघीकर (नांदेड जिल्हा संघटक, राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र राज्य) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी खंदारे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या व त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
नागरिकांशी सुसंवाद ठेवत प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याची भावना मनोज खंदारे यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांच्या नियुक्तीमुळे जवळगाव वर्तुळातील महसूल प्रशासन अधिक प्रभावी व गतिमान होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
