किनवट | देवानंद गुंडेकर सरसमकर
पीएम श्री एकलव्य आदर्श निवासी विद्यालय, सहस्त्रकुंड (ता. किनवट) येथे शैक्षणिक सत्र 2026-27 च्या प्रारंभानिमित्त विद्यार्थी प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दि. 20 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात इयत्ता सहावीच्या नवागत विद्यार्थ्यांसह इतर सर्व विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
प्रवेशोत्सवानिमित्त विद्यालय परिसर आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला होता. विद्यालयातील शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून तसेच मिठाई वाटप करून स्वागत केले. नवागत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व पालकांसाठी विशेष सेल्फी स्टँडची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक पालकांनी आपल्या पाल्यांसह सेल्फी काढून या आनंददायी क्षणांची आठवण जपली.
विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती राधिका राजीव गोलटकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना विद्यालयातील विविध सुविधा, शैक्षणिक संधी, स्पर्धा परीक्षा, निवासी शिक्षण व्यवस्था तसेच शालेय शिस्त याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींचा लाभ घेऊन उज्ज्वल भवितव्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास प्रकल्प अधिकारी, किनवट यांचे प्रतिनिधी बोर्डे जोशी पालक अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे संगीत शिक्षक ज्ञानेश्वर शंकर डांगे यांनी केले.
प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील कला शिक्षक तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. नवागत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना शिक्षणाच्या नव्या प्रवासासाठी प्रेरित करणारा हा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न झाला.
