हिमायतनगर देवानंद गुंडेकर सरसमकर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पवना येथे दि. 17 जून रोजी बुधवारी नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले आणि त्यांच्या पायांचे ठसे घेऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची आनंददायी सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश गोसलवाड, राज्य मराठी पत्रकार परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष देवानंद गुंडेकर (सरसमकर) यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना देवानंद गुंडेकर सर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड निर्माण करून स्वतःचे ध्येय निश्चित करण्याचे आवाहन केले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नियमित अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते, असे त्यांनी सांगितले. तसेच मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याने पालकांनी आपल्या पाल्यांना मराठी शाळेत प्रवेश द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख डी. एस. पालेकर यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा व विविध कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक प्रयत्नशील राहतील आणि विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख डी. एस. पालेकर सर, एम. एच. वाघमारे सर, एस. एस. सिद्धेश्वरे सर, आर. बी. म्याकलवाड सर , ए. जे. डोणे मॅडम पालक संभाजी राऊत यांच्यासह वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
