हिमायतनगर : देवानंद गुंडेकर सरसमकर
हिमायतनगर तालुक्यातील खडकी बा. येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यात सक्रिय असलेले शुद्धोधन हनवते यांचे वडील देवराव रूपाजी हनवते यांचे मंगळवार, दि. ११ ऑगस्ट रोजी रात्री उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. ते रेल्वे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी होते.
वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे हनवते कुटुंबीयांसह नातेवाईक, मित्रपरिवार व परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे. देवराव हनवते यांनी आपल्या सेवाकाळात रेल्वे विभागात प्रामाणिकपणे सेवा बजावली होती. निवृत्तीनंतर त्यांनी आपल्या कुटुंबाच्या संगोपनासाठी तसेच सामाजिक व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत आयुष्य व्यतीत केले. त्यांच्या स्वभावातील साधेपणा, मनमिळावूपणा आणि सर्वांशी आपुलकीने वागण्याची वृत्ती यामुळे त्यांचा मोठा परिचित वर्ग होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पत्रकार शुद्धोधन हनवते यांच्यासह संपूर्ण कुटुंबावर या निधनामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.दरम्यान, हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी खडकी बा. येथे पत्रकार शुद्धोधन हनवते यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी दिवंगत देवराव रूपाजी हनवते यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
त्यानंतर माजी आमदार जवळगावकर यांनी हनवते कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या दुःखात सहभागी होत सांत्वन केले. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचे निधन हे मोठे दुःख असून, या कठीण प्रसंगी संपूर्ण कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दिवंगत देवराव हनवते यांच्या आत्म्यास शांती लाभावी आणि हनवते कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
यावेळी परिसरातील नागरिक, पत्रकार बांधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही हनवते कुटुंबीयांची भेट घेऊन शोकसंवेदना व्यक्त केल्या.
या प्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष संजय माने, पापा पार्डीकर, संजय पाटील दुधडकर, गोविंद माने, सरपंच माधव शिंदे, शिवाजी पाटील शिंदे, दयानंद हाटे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी दिवंगत देवराव हनवते यांच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
