हिमायतनगर : देवानंद गुंडेकर सरसमकर
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून हिमायतनगर येथील गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी भारताची भौगोलिक, सांस्कृतिक आणि भाषिक विविधता अधोरेखित करणारा अभिनव शैक्षणिक उपक्रम साकारला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी ‘विविधतेत एकता’ या भारतीय संस्कृतीच्या महान विचाराचा प्रभावी संदेश दिला.
इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानावर भारताचा भौतिक व राजकीय नकाशा प्रत्यक्ष साकारला. या नकाशामध्ये भारतातील विविध राज्ये, त्यांची मातृभाषा, पारंपरिक नृत्यप्रकार, संस्कृती तसेच त्या-त्या राज्यांची वैशिष्ट्ये आकर्षक पद्धतीने मांडण्यात आली. यासोबतच भारतीय राष्ट्रध्वजाच्या उत्क्रांतीचा इतिहासही माहितीफलकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सादर केला.
या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. राजेंद्र वानखेडे सर आणि डॉ. मनोहर राठोड सर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या नकाशाची पाहणी करून त्यांच्या कल्पकतेचे व मेहनतीचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील ज्ञानासोबत देशाचा इतिहास, संस्कृती, भूगोल आणि विविधता प्रत्यक्ष अनुभवातून समजण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ नकाशावाचनाचे ज्ञान मिळाले नाही, तर भारताच्या विविधतेमागील एकात्मतेची जाणीवही झाली. भूगोल, इतिहास आणि संस्कृती यांचा सुंदर संगम साधत विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेला, कलागुणांना आणि संघभावनेला वाव दिला.
हा संपूर्ण उपक्रम श्री. विशाल सर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांनी मेहनत, कल्पकता आणि टीमवर्कच्या माध्यमातून यशस्वीपणे पूर्ण केला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहकार्य केले.
स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात साकारण्यात आलेला हा अनोखा सांस्कृतिक नकाशा उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून “भारताची विविधता हीच भारताची खरी ओळख आणि एकता हीच भारताची शक्ती” हा प्रेरणादायी संदेश प्रभावीपणे अधोरेखित झाला.
