हिमायतनगर प्रतिनिधी:-
हिमायतनगर ते वारंगटाकळी या मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेले रस्त्यालगतचे वृक्षारोपण काम अत्यंत निकृष्ट दर्जात होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वृक्षारोपणासाठी करण्यात आलेली खड्ड्यांची खोली अत्यंत कमी असून लागवड करण्यात येणारी रोपे कुजमुजलेली आणि दुर्बळ अवस्थेत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या कामाची पुढील तीन वर्षे देखभाल आणि जोपासना करण्याची जबाबदारी संबंधित गुत्तेदाराकडे असताना देखील वृक्षारोपण केवळ दिखाऊ पद्धतीने केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
स्थानिकांनी सांगितले की, “रोपे लागवडीच्या वेळेलाच अशक्त दिसत आहेत, तर पुढील तीन वर्षे त्यांची जोपासना होणार कशी?” असा थेट प्रश्न उपस्थित होत असून या कामाची तत्काळ चौकशी करून जबाबदारांवर कारवाईची मागणी होत आहे.
निकृष्ट दर्जाच्या या वृक्षारोपणामुळे सरकारी निधीची गैरवापर होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिकांनी संबंधित विभागाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून दर्जेदार वृक्षारोपण करावे, अन्यथा संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येईल.आशा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
