हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:
हिमायतनगर तालुक्यात पैनगंगा नदीपत्रातून अवैध वाळू उपशाचे सत्र दिवसेंदिवस बेधडक सुरू असून शासनाच्या महसुलाला प्रचंड फटका बसत आहे. विरसनी, घारापुर, कोठा तांडा, धानोरा, वारंगटाकळी या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा, वाहतूक आणि साठा सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसत असूनही स्थानिक तहसील प्रशासन मात्र याकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे.
रात्री-अपरात्री धडाकेबाजपणे सुरू असलेली ही गैरकायदेशीर वाळू माफियांची तस्करी थांबवण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याने अवैध धंद्यांना खुला पाठींबा मिळत असल्याचा सूर स्थानिकांतून उमटत आहे. शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलाची अशा अवैध उपशामुळे होत असलेली हानी चिंताजनक असून, या सर्व घडामोडींवर प्रशासन मौन का बाळगते आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
स्थानिक लोकांच्या तक्रारी, पथकरी गाड्यांची वर्दळ आणि सुरू असलेला अवैध धंदा पाहता प्रशासनाचे कामकाज संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. पैनगंगा नदी परिसरातील सुरू असलेल्या या अवैध वाळू माफियांवर तातडीने अंकुश न ठेवल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

