हिमायतनगर / प्रतिनिधी :-
हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय सध्या गंभीर समस्यांच्या विळख्यात सापडले असून, डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तीव्र अभावामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली अद्ययावत इमारत आणि डिजिटल एक्स-रेसारखी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध असूनही ती वापराअभावी धूळखात पडल्याचे विदारक चित्र आहे.
ग्रामीण रुग्णालयात अनेक पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत. उपलब्ध मनुष्यबळावरच संपूर्ण तालुक्याचा भार पडत असल्याने बाह्यरुग्ण विभागात तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. आपत्कालीन रुग्णसेवा, प्रसूती सेवा तसेच प्राथमिक उपचारांमध्येही अडथळे येत असून गंभीर रुग्णांना नांदेड किंवा इतर ठिकाणी रेफर करावे लागत आहे. त्यामुळे गरीब व ग्रामीण रुग्णांची आर्थिक व मानसिक कुचंबणा होत आहे.
विशेष म्हणजे, शासनाने मोठा निधी खर्च करून डिजिटल एक्स-रे मशीनसह आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र तांत्रिक कर्मचारी नसल्याने ही यंत्रणा सुरूच होत नाही. परिणामी रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन महागड्या तपासण्या कराव्या लागत आहेत. इमारत, उपकरणे आहेत; मात्र सेवा देण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नसल्याने रुग्णालयच जणू ‘आजारी’ असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
हिमायतनगरसारख्या आदिवासी व ग्रामीण भागासाठी हे रुग्णालय अत्यंत महत्त्वाचे असल्याने, केवळ इमारती आणि उपकरणांवर खर्च न करता प्रत्यक्ष सेवा सक्षम करण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
या गंभीर परिस्थितीकडे लोकप्रतिनिधी व आरोग्य प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व रुग्णांकडून होत आहे. रिक्त पदे त्वरित भरणे, तांत्रिक कर्मचारी नियुक्त करणे व उपलब्ध यंत्रणा कार्यान्वित करणे, अशी ठोस पावले उचलली नाहीत तर ग्रामीण जनतेच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.अन्यथा विविध संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
