हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:-
हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे, या उद्देशाने हिमायतनगर पोलिस ठाण्यात सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांची शांतता कमिटी बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत पोलिस निरीक्षक अमोल भगत यांनी सर्व उमेदवारांना निकालाच्या दिवशी संयम राखण्याचे, विजय अथवा पराजय स्वीकारून लोकशाही मूल्यांचा सन्मान करण्याचे आवाहन केले. आनंदोत्सव साजरा करताना किंवा निषेध व्यक्त करताना कायदा व सुव्यवस्थेला बाधा येईल असे कोणतेही कृत्य होऊ नये, अशी स्पष्ट सूचना त्यांनी दिली.
तसेच मिरवणुका, घोषणाबाजी, फटाके फोडणे, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणे, अफवा पसरवणे आदी प्रकार केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. निवडणूक निकालाच्या दिवशी शांतता राखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी व कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचेही पोलिस निरीक्षक अमोल भगत यांनी सांगितले.
या बैठकीस सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक निकालाच्या दिवशी शांतता, सलोखा व कायद्याचे पालन राखण्याचा संकल्प सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.
