मौजे सरसम बु ते वाशी दरम्यान होत असलेल्या रोडचे काम उत्कृष्ट दर्जाचे.. माजी आ. जवळगावकरांच्या पाठपुराव्याला यशः १२ कि.मी. चा रस्ता पूर्ण; ग्रामस्थांना दिलासा

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:-

तालुक्यातील जंगलाच्या पायथ्याशी वसलेल्या शंभर टक्के आदिवासी भागातील सुमारे बारा किलोमीटर लांबीचा महत्त्वाचा रस्ता अखेर पूर्ण झाला असून, या मार्गावरील गावकरी, शेतकरी व प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून दयनीय अवस्थेत असलेला हा रस्ता आता वाहतुकीसाठी खुला झाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे.

सरसम बु येथील इंदिरा नगरपासून आंदेगाव फाटा, पवना, दरेसरसम, भिस्याची वाडी, कपाट्याची वाडी, उंबरहिरा तांडा, वाशी आदी गावांना जोडणारा हा महत्त्वपूर्ण रस्ता तेलंगणा राज्याशी थेट संपर्क साधणारा जवळचा मार्ग आहे.

मात्र रस्ता खराब झाल्यामुळे पावसाळ्यात वाहतूक ठप्प होत असे. विशेषतः रुग्ण, विद्यार्थी व शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
या रस्त्याच्या कामासाठी राज्यात काँग्रेसची सत्ता नसताना देखील तत्कालीन आमदार, लोकनेते माधवराव पाटील जवळगावकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. निवेदने व विविध स्तरांवर पाठपुराव्याद्वारे त्यांनी प्रशासनाचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आणि काम पूर्णत्वास जात आहे.

रस्ता मार्गी लागल्याने आदिवासी भागातील विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण व नागरिकांना मोठा फायदा झाला आहे. पावसाळ्यातील अडथळे दूर होऊन शेतीमाल वाहतूक सुलभ झाली आहे. आरोग्य सेवा व आपत्कालीन प्रसंगी हा रस्ता अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसेच तेलंगणा राज्याशी थेट संपर्क झाल्याने व्यापार व दळणवळणालाही गती मिळणार आहे.

या कामासाठी शासकीय गुत्तेदार उमेश सूर्यवंशी व निलेश सूर्यवंशी यांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली दर्जेदार काम केल्याचे बोलले जात असून, हिमायतनगर तालुक्यातील रस्ते व पूरक कामांबाबत त्यांची विश्वासार्ह प्रतिमा अधिक बळकट झाली आहे. त्यामुळे दरम्यान असलेल्या गावातील जनतेने लोकनेते माजी आमदार माधराव पाटील जवळगावकर यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!