हदगाव तालुका प्रतिनिधी:-
हदगाव तालुक्यातील जांभळा परिसरात सुरू असलेल्या रस्ते बांधकाम कामाबाबत गंभीर अनियमिततेचे आरोप होत असून हे काम अतिशय निष्क्रिय आणि बोगस पद्धतीने सुरू असल्याची नागरिकांची तक्रार आहे. संबंधित ठेकेदाराने शासन नियमांचे खुलेआम उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
शासन नियमांनुसार कामाच्या ठिकाणी प्रकल्पाचा तपशील, कामाची किंमत, मंजूरी क्रमांक, कालावधी आदींची माहिती असलेला फलक लावणे अनिवार्य असताना येथे कोणताही शासकीय फलक लावण्यात आलेला नाही.रस्त्याच्या बांधकामात योग्य प्रमाणात सिमेंटचा वापर न करता डस्ट व गिट्टीचा अतिरेक केला जात असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
सिमेंटच्या जागी डस्ट वापरल्यामुळे रस्त्याची गुणवत्ता गंभीर स्वरूपात घसरत असून वाळूचाही वापर न केल्याने हा रस्ता टिकाव धरणार कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की सध्याच्या पद्धतीने हे काम झाले तर हा रस्ता एक ते दोन वर्षांतच खड्डेमय होणार आहे.
तसेच रस्त्याच्या बांधकामासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली मातीची क्युरींग प्रक्रिया योग्य प्रकारे न करता थेट डस्ट टाकून काम पूर्ण केल्याचे समोर आले आहे. ईस्टीमेटनुसार काम न होता भ्रष्टाचाराच्या जोरावर दर्जाहीन काम सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शासकीय अभियंते टक्केवारी घेऊन कार्यालयात बसतात आणि ठेकेदार राजकीय आश्रयाने काम उडवून लावत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.
लाखो रुपयांच्या प्रकल्पावर कमी खर्चामध्ये काम उरकून उर्वरित रक्कम स्वतःच्या खिशात घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा जनतेमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ तपासणी करून कामाचे मूल्यांकन करण्याची, गुणवत्तेची पाहणी करण्याची आणि सुरू असलेला भ्रष्टाचार त्वरित थांबविण्याची जोरदार मागणी केली आहे.स्थानिक प्रशासन याबाबत काय कारवाई करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
