मंगरूळ येथील निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाविरोधात; १२ जानेवारीपासून अमर उपोषण..

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:-

हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ येथे गतवर्षी २०२५ मध्ये दलित वस्तीमध्ये करण्यात आलेल्या सिमेंट रोडचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रोडचे प्रत्यक्षात मात्र कामात दर्जा व नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचा दावा मंगरूळ येथील ग्रामवासीयांनी केला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्याच्या कामामध्ये बांधकाम विभागाचे अभियंता, ग्रामसेवक व सरपंच यांनी मनमानी कारभार केला आहे. रस्त्याच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले सोलिंग न करता मुरूम मिश्रित दगडाचा वापर करण्यात आला. तसेच नियमानुसार १० व २० सेंमीचे लेयर घेण्यात आलेले नाहीत. करण्यात आलेल्या काँक्रीटची गुणवत्ता देखील अत्यंत निकृष्ट असल्यामुळे हा रस्ता अल्पावधीतच खराब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर मंगरूळ येथील ग्रामस्थांनी सदर कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित रस्त्याचे देयक (बिल) तात्काळ स्थगित करावे, अशीही ठाम मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास, सर्व गावकऱ्यांच्या वतीने दिनांक १२ जानेवारी २०२६ पासून हिमायतनगर येथील पंचायत समितीसमोर अमर उपोषण करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.यावेळी गंगाधर पांडलवाड, मारुती पैलवाड, संतोष शिरगिरे, विठ्ठल खंदारे, प्रकाश गुलझरवाड व रुद्रा गुलझरवाड यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!