हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:-
हिमायतनगर तालुक्यातील खैरगाव (ज) गावात नुकतेच करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, कामात मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सिमेंट रस्त्याच्या कामात माती मिश्रित वाळूचा वापर करण्यात आला आहे. तसेच, नियमानुसार वापरण्यात येणाऱ्या स्वच्छ वाळूऐवजी डस्टचा वापर जास्त प्रमाणात करण्यात आला आहे. यामुळे रस्त्याची गुणवत्ता कमी झाली असून भविष्यात रस्ता लवकर खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.विशेष म्हणजे, रस्त्याच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेल्या M-10 लेअर व M-20 लेअर या थरांचा वापरच करण्यात आलेला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या गंभीर त्रुटींमुळे रस्त्याचे आयुष्य कमी होणार असून शासनाचा निधी वाया जात असल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
या कामावर संबंधित विभागाचे अभियंता व कंत्राटदार यांनी योग्य देखरेख न केल्याचा आरोपही केला आहे. निकृष्ट कामाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच रस्ता पुन्हा दर्जेदार पद्धतीने तयार करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर ग्रामस्थ आंदोलनाचा मार्ग अवलंबतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
