हिमायतनगर प्रतिनिधी| विकास गाडेकर
उद्योजक तथा व्ही.पे.के. उद्योग समूहाचे सीईओ संदीप पाटील कवळे यांनी हिमायतनगर तालुक्यातील पवना शिवारात उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित ऊस कारखान्याच्या जागेस भेट देऊन सखोल पाहणी केली. यावेळी त्यांनी परिसराची भौगोलिक परिस्थिती, पाणी उपलब्धता, वाहतूक सुविधा तसेच शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनाबाबत माहिती घेतली. पाहणी दरम्यान त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा व सूचना जाणून घेतल्या.
प्रस्तावित ऊस कारखान्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार असून ऊसाला योग्य दर, वेळेवर गाळप तसेच स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला. संदीप पाटील कवळे यांनीही शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न राहील, असे आश्वासन दिले.
यानंतर संदीप पाटील कवळे यांनी हिमायतनगर शहरास भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांच्या निवासस्थानी त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ऊस कारखान्याच्या माध्यमातून हिमायतनगर तालुक्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा आशावाद उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
सत्कार प्रसंगी सुभाष राठोड, जनार्दन ताडेवाड, समदखान, गजानन सूर्यवंशी, विठ्ठल ठाकरे, अखिल भाई, विनोद गुंडेवार, सरदार खान, फेरोज खान, अब्दुल कलीम, बाळू मेंडके, इलियास भाई, रमेश पंडित, जिशान मिर्झा, योगेश चिलकावार, दीपक कात्रे यांच्यासह नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
