हिमायतनगर तालुका प्रतिनिधी: —
हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर येथील प्रख्यात कवी-लेखक व शाहीर रामराव देवराव वानखेडे (पळसपूरकर) यांना भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार उद्या दि. १५ फेब्रुवारी २०२०, रविवार रोजी होणाऱ्या आठव्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनात प्रदान करण्यात येणार आहे. हे भव्य संमेलन बिरसा मुंडा साहित्य नगरी, शिव-पार्वती मंगल कार्यालय, भावसार चौक, नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे.
शाहीर रामराव वानखेडे गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ आपल्या प्रभावी गायन-कवितांच्या माध्यमातून दारूबंदी, हुंडाबंदी, व्यसनमुक्ती, तसेच दलित समाज जागृतीसाठी सातत्याने कार्यरत आहेत. आपल्या कलाविष्कारातून त्यांनी अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लहुजी वस्ताद साळवे, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले यांसह ६६ महापुरुषांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य केले आहे.
तसेच ते हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे समर्थक म्हणूनही ओळखले जातात. या प्रतिष्ठेच्या पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर पळसपूर ग्रामस्थांसह तालुक्यातील मान्यवरांनी शाहीर रामराव वानखेडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील सामाजिक-सांस्कृतिक कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
