शाहिर सुभाष गुंडेकर यांना वामनदादा कर्डक कला सन्मान पुरस्कार जाहीर

हिमायतनगर प्रतिनिधी :-

हिमायतनगर तालुक्यातील प्रख्यात कवी, शाहिर व समाजप्रबोधनकार सुभाष पांडुरंग गुंडेकर (सरसमकर) यांना भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनात महाकवी वामनदादा कर्डक कला सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी आठवे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन हे भव्य संमेलन बिरसा मुंडा साहित्य नगरी, शिवपार्वती मंगल कार्यालय, भावसार चौक, नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे.शाहिर सुभाष गुंडेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या प्रभावी गायनकलेच्या माध्यमातून दारूबंदी, हुंडाबंदी, व्यसनमुक्ती, दलित समाजजागृती तसेच सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी सातत्याने पुढे नेत आहेत.

त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळ, अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांसह थोर महापुरुषांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य केले आहे.या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनात हिमायतनगर, तालुक्यातील सरसम बु येथील येथील ज्येष्ठ गायक व समाजप्रबोधक म्हणून सुभाष गुंडेकर यांच्या दीर्घकालीन व सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेऊन, नामवंत दलित साहित्यिक महाकवी वामनदादा कर्डक यांच्या नावाने दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा कला सन्मान पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.


संमेलनात देशभरातील साहित्यिक, कवी, विचारवंत, कलाकार व समाजसेवक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून विविध साहित्यिक सत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम व पुरस्कार वितरण सोहळ्यामुळे संमेलन विशेष लक्षवेधी ठरणार आहे. शाहिर सुभाष गुंडेकर यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!