मुख्य संपादक:-देवानंद गुंडेकर सरसमकर
नांदेड जिल्हा पोलिसांनी ग्रामीण भागातील अवैध दारू निर्मिती व विक्रीला आळा घालण्यासाठी ‘ऑपरेशन फ्रॅकडाऊन’ अंतर्गत इस्लापूर परिसरात मोठी संयुक्त कारवाई केली. दि. 3 मे 2026 रोजी पहाटे 4 वाजल्यापासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत मोजे शिवणी व आजूबाजूच्या दुर्गम भागात नियोजनबद्ध पद्धतीने धाड टाकण्यात आली.
या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अवैध दारू साहित्य जप्त केले. यामध्ये सडवा (17,250 लिटर), हातभट्टी दारू (166 लिटर), मोहफुले (1,500 किलो) तसेच रसायनमिश्रित द्रव्य (2,700 लिटर) यांचा समावेश आहे. जप्त मालाची एकूण अंदाजित किंमत सुमारे ₹10,26,000 इतकी आहे. तसेच 22 गुन्हे दाखल करण्यात आले असून 25 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
या संयुक्त कारवाईत इस्लापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, एकूण 1 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 10 अधिकारी आणि 105 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. तसेच 2 RCP पथकांनीही सहकार्य केले.
पोलिसांनी गावातील नागरिक व महिलांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले असून, अशा अवैध कृत्यांविरोधात नागरिकांनी माहिती देऊन पोलिसांना मदत करावी, असे आवाहन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी 112 हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
ही कारवाई ग्रामीण भागातील अवैध व्यवसायांवर प्रभावी आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
