हिमायतनगर महसूल कर्मचारी संघटनेचा राज्यातील बेमुदत संपाला पाठिंबा

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:-

राज्यातील प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ नांदेड जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, शाखा हिमायतनगर यांच्या वतीने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.


निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, राज्यातील सुमारे 17 लाख सरकारी कर्मचारी व शिक्षकांच्या विविध
मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, यासाठी कर्मचाऱ्यांनी अनेकदा शासनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.


या पार्श्वभूमीवर दि. 22 एप्रिल 2026 पासून राज्यातील कर्मचारी व शिक्षक बेमुदत संपावर जाणार असून, या संपात महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचाही सक्रिय सहभाग राहणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. हिमायतनगर तालुक्यातील सर्व महसूल कर्मचारी – तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक आदींनी संपात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.


संघटनेचे अध्यक्ष एम. झेड. सिद्धीकी, उपाध्यक्ष विशाल शेवाळकर, सचिव गोविंद पांपटवाड तसेच कोषाध्यक्ष कपिल जामकर, सुभाष कोंडलवार यांनी शासनाने तातडीने मागण्यांवर तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.या निवेदनावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, एक प्रत जिल्हाध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना, नांदेड यांना पाठविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!