हिमायतनगर :- देवानंद गुंडेकर सरसमकर
तहसील कार्यालय हिमायतनगरच्या वतीने नागरिकांच्या महसूल विषयक अडचणी सोडवण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ दिनांक ८ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. या विशेष शिबिराच्या माध्यमातून विविध महसूल सेवा, दाखले व जमिनीशी संबंधित प्रकरणे एकाच ठिकाणी त्वरित पूर्ण करण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे.
या शिबिरात नागरिकांना प्रमाणपत्रे व दाखले देणे, प्रलंबित फेरफार नोंदी निकाली काढणे, 7/12 व 8-अ उताऱ्यांतील दुरुस्त्या, डिजिटल स्वाक्षरीचे उतारे, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्रे, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र तसेच पीक विमा व पी.एम. किसान नोंदणी यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
तसेच जमिनीच्या अभिलेखांचे अद्ययावतकरण, अकृषिक (NA) प्रकरणांबाबत मार्गदर्शन, नवीन बिनशेती नोंद प्रक्रिया, तुकडेबंदी उल्लंघन प्रकरणांचा निपटारा, भूसंपादन व परवानगी विषयक मार्गदर्शन यांचाही समावेश आहे. याशिवाय विविध शासकीय योजनांचा लाभ, सामाजिक अर्थसहाय्य, ई-मोजणी अर्ज, घरकुल योजनांसाठी मदत आदी सेवा देखील शिबिरात दिल्या जाणार आहेत.
नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आपले अर्ज शिबिराच्या तारखेपूर्वी संबंधित ग्राम महसूल अधिकारी किंवा मंडळ अधिकाऱ्यांकडे जमा करावेत, असे आवाहन तहसीलदार पल्लवी टेमकर मॅडम यांनी केले आहे.
