मौजे सरसम बु येथे दलित वस्तीत घाणीचे साम्राज्य 👉ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त; आंदोलनाचा इशारा

हिमायतनगर:- देवानंद गुंडेकर सरसमकर

हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु येथील दलित वस्तीत गेल्या अनेक महिन्यांपासून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दलित वस्तीतून जाणारी नाली तुटलेल्या अवस्थेत भरून पडली असून, सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात अस्वच्छतेचे मोठे संकट निर्माण झाले आहे.


स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा ग्रामसेवक तसेच ग्रामविकास अधिकारी कैलास डुडूळे यांच्याकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दलित वस्तीतून जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे खराब झाला असून, त्या ठिकाणी पुलाची सुविधा नसल्यामुळे “रस्त्यात नाली आहे की नालीच रस्ता झाला आहे?” असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून दलित वस्तीतील नागरिक प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. काही दिवसांतच पावसाळ्याला सुरुवात होणार असल्यामुळे नालीचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्य रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.


याशिवाय दलित वस्तीलगत साचलेल्या घाणीमुळे डासांचे प्रमाण वाढून रोगराई पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.


दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ या नालीच्या पाण्याची व घाणीची योग्य विल्हेवाट लावून समस्या मार्गी लावावी, अन्यथा संविधानिक मार्गाने अमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दलित वस्तीतील नागरिकांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!