हिमायतनगर तालुका:- देवानंद गुंडेकर सरसमकर
नांदेड जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव, टोकेरे कोळी व मल्हार कोळी समाज बांधवांनी विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून तातडीने न्याय देण्याची मागणी केली आहे. दिनांक ८ जून २०२६ रोजी सादर करण्यात आलेल्या या निवेदनात जात वैधता प्रमाणपत्र, जात पडताळणी, शैक्षणिक प्रवेश आणि समाजावरील अन्याय-अत्याचार यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जमाती प्रवर्गातील कोळी महादेव, टोकेरे कोळी व मल्हार कोळी समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थी, युवक, नोकरीधारक व सर्वसामान्य नागरिकांचे शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक नुकसान होत असल्याची भावना समाजामध्ये निर्माण झाली आहे.
तसेच, आदिवासी विकास विभागाने २६ मे २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकामुळे जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची झाल्याचा आरोप करण्यात आला असून हे परिपत्रक तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात जात पडताळणी समिती, किनवट (मुख्यालय छत्रपती संभाजीनगर) तसेच इतर समित्यांकडे हजारो प्रकरणे प्रलंबित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रलंबित प्रकरणांमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, शिष्यवृत्ती, नोकरीच्या संधी व इतर शासकीय लाभ रखडल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश देण्याची मागणी समाज बांधवांनी केली आहे.
याशिवाय, कोळी महादेव समाजातील विद्यार्थ्यांना शासकीय आदिवासी वसतिगृहांमध्ये प्रवेश देताना जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती करण्यात येत असल्याने अनेक गरीब व होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याची बाब निवेदनात मांडण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश देण्याबाबत स्पष्ट शासन आदेश काढावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
समाजावरील वाढत्या अन्याय व अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख करून दोषींवर अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
यावेळी निवेदन देण्यासाठी लक्ष्मण जंगेवाड,गजानन सोमेवाड,राम किशन तरटवाड ,हिमायतनगर तालुका अध्यक्ष मनोज मोतकुलवाड,रामेश्वर पिटलेवाड, माधव याटेवाड ,शिवशंकर येगलेवाड,गजानन सादलवाड,(सावळेश्वर) यांच्यासह आदी उपस्थिती होते.
