हिमायतनगर | प्रतिनिधी:-
अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरण तात्काळ लागू करावे, तसेच सामाजिक न्यायाच्या विविध मागण्यांसाठी डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुणे ते मुंबई पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ABS फोर्सचे हिमायतनगर तालुका अध्यक्ष गजानन वाघमारे यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अपेक्षित ठेवलेल्या सामाजिक न्यायाच्या समतोल वाटपासाठी ही पदयात्रा काढण्यात येत असून, अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाची अंमलबजावणी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देणे, त्यांच्या जयंतीला शासकीय सुट्टी जाहीर करणे, तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक मागण्यांसाठी हा लढा उभारण्यात आला आहे.
ही पदयात्रा १७ जून २०२६ रोजी क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे समाधीस्थळ, पुणे येथून प्रारंभ होऊन २४ जून २०२६ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे समाप्त होणार आहे. राज्यभरातील सामाजिक कार्यकर्ते, युवक, विद्यार्थी आणि बहुजन समाजातील नागरिकांनी या आंदोलनात सहभागी होऊन आपल्या हक्कांसाठी एकजूट दाखवावी, असे आवाहन गजानन वाघमारे यांनी केले.
यावेळी त्यांनी सांगितले की, सामाजिक न्याय, समान हक्क आणि वंचित घटकांच्या प्रगतीसाठी ही पदयात्रा महत्त्वाची असून हिमायतनगर तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलनाला बळ द्यावे.
“लढा एकजुटीचा, आपल्या अधिकाराचा” या घोषवाक्यासह पदयात्रेची तयारी सुरू असून विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यामध्ये सहभागी होणार आहेत.
