आश्रम शाळेतील शिक्षकांना मुख्यालयाबाबत शासनाचा कडक निर्णय; गैरहजर शिक्षकांवर कारवाईचे निर्देश

किनवट:- देवानंद गुंडेकर सरसमकर

किन्नवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्यास राहणे बंधनकारक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांनी २४ ऑगस्ट २०२१ रोजी जारी केलेल्या पत्रातील सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. अनेक शिक्षक व मुख्याध्यापक मुख्यालयात राहत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.


यानुसार, प्रत्येक आश्रमशाळेतील उपलब्ध निवासव्यवस्था, प्रत्यक्ष वास्तव्यास असलेले कर्मचारी तसेच रिक्त निवासस्थाने याबाबतची सविस्तर माहिती तातडीने कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना शाळांना भेट देऊन मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मुख्यालयात वास्तव्यास आहेत की नाही याची प्रत्यक्ष पडताळणी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.


शासनाच्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!