हिमायतनगरात SGM ॲप द्वारे पंधरा कोटींची फसवणुक

हिमायतनगर : देवानंद गुंडेकर सरसमकर

शहरासह तालुक्यातील असंख्य गावांतील लोकांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत एसजीएम (स्मार्ट ग्रीन मोबिलिटी) या ऑनलाइन अॅपद्वारे कथित आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. सदर अॅप अचानक बंद पडल्याने हजारो लोकांची तब्बल १० ते १५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे यात अडकलेल्या लोकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसजीएम या अॅपमध्ये विविध व्हीआयपी पॅकेज, मेंबरशिप, रेफरल बोनस, डिलिव्हरी कमिशन, दैनंदिन उत्पन्न अशा आकर्षक योजनांचे आमिष दाखवून हिमायतनगर तालुक्यातील हजारो लोकांकडून ऑनलाइन पद्धतीने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून घेण्यात आली. त्यामध्ये हिमायतनगरातील आंबेडकर चौक येथील धमपाल पोपुलवार यांचे ३ लाख ७२ हजार या ॲप द्वारे फसवणूक होऊन नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.काही दिवसांत पैसा दुप्पट, घरबसल्या उत्पन्न, मित्र जोडल्यास मोठे कमिशन अशा गोड आश्वासनांमुळे अनेक युवक, महिला, शेतकरी, नोकरदार तसेच निवृत्त नागरिक या योजनेकडे आकर्षित झाले.


हिमायतनगर शहरासह सिरंजनी, टेंभी, डोल्हारी, वडगाव, सवना, पोटा, वाशी, खडकी आणि इतर अनेक गावांमध्ये स्थानिक एजंट व टीम लीडर तयार करून सदस्य नोंदणी करण्यात आली. गिफ्ट, सोशल मीडियावर आलिशान जीवनशैली, मोठे बॅलन्स, कमिशनचे स्क्रीनशॉट आणि यशोगाथा दाखवत नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला.


मात्र काही दिवसांपूर्वी हे अॅप अचानक बंद पडले. लॉगिन होत नसल्याने तसेच पैसे अडकून पडल्याने घाबरलेल्या लोकांनी स्थानिक एजंटशी संपर्क साधला असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. काहींनी सर्व्हर अपडेट सुरू आहे, कंपनी पुन्हा सुरू होईल, असे सांगण्यात आले. मात्र अद्याप व्यवहार सुरळीत झालेले नाहीत.


या प्रकारामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!