हिमायतनगर :- देवानंद गुंडेकर सरसमकर
हिमायतनगर तालुक्यातील वाघी–कामारी दरम्यान सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामातील कथित निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत मागील काही दिवसांपासून विविध दैनिके व डिजिटल प्रसारमाध्यमांमधून सातत्याने बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या वृत्तांची दखल घेत आज (दि. १२ जुलै) जिल्हा परिषद बांधकाम विभाग, हदगावचे अभियंता बाशिंगे तसेच संबंधित कंत्राटदार यांनी वाघी येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी व चौकशी केली.
चौकशीदरम्यान निकृष्ट दर्जाचे झालेल्या कामाची नोंद घेण्यात आली असून संबंधित भागाचे पुनर्बांधकाम करण्यास तात्काळ सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी दर्जेदार व नियमांनुसार काम करण्याची मागणी केली.
यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी सांगितले की, विविध दैनिके आणि डिजिटल प्रसारमाध्यमांनी सातत्याने पाठपुरावा करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडल्यामुळेच संबंधित विभागाला या प्रकरणाची चौकशी करावी लागली आणि निकृष्ट दर्जाचे काम काढून पुनर्बांधणी सुरू करण्यात आली. प्रसारमाध्यमांच्या या सकारात्मक भूमिकेचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
