वाघी येथील कालव्याच्या निकृष्ट कामावर शेतकऱ्यांचा संताप; गुत्तेदाराकडून धमकी दिल्याचा आरोप

हिमायतनगर :- देवानंद गुंडेकर सरसमकर

हिमायतनगर तालुक्यातील मौजे वाघी येथे पाटबंधारे विभागामार्फत सुरू असलेल्या आडव्या कालव्याच्या (कॅनॉल) कामामध्ये संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांच्या संगनमताने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित कालव्याचे काम सर्वे क्रमांकानुसार नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलेले नाही. तसेच कालव्याच्या दोन्ही बाजूंना योग्य प्रकारे बांधकाम न करता मातीमिश्रित मुरूम टाकण्यात आल्याने शेतीचा वापर करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

विशेष म्हणजे, मायनर क्रमांक १०५ चे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय कालव्यावरील सर्व मायनर व्हॉल्व्ह बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक पाणी मिळत नसल्याची तक्रार आहे. परिणामी शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या समस्येबाबत काही शेतकऱ्यांनी संबंधित गुत्तेदाराशी दूरध्वनीवर संपर्क साधून जाब विचारला असता, त्यांना मारहाण करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी निकृष्ट कामाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून दोषी अधिकारी व गुत्तेदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच कालव्याचे काम दर्जेदार पद्धतीने पुन्हा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!