हिमायतनगर |देवानंद गुंडेकर सरसमकर
दैनिक लोक परिवर्तन समूह, महाराष्ट्र राज्य यांच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय ‘पत्रकार भूषण पुरस्कार २०२६’ हा हिमायतनगर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार नागोराव शिंदे पळसपुरकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
मागील अनेक वर्षांपासून त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून निर्भीड, निष्पक्ष आणि सत्याधिष्ठित वृत्तांकन करत समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडली आहे.
सामाजिक जनजागृती, सर्वसामान्यांच्या समस्या शासन-प्रशासनापर्यंत पोहोचविणे तसेच नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल असे पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार जाहीर होताच पत्रकार, सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनेही नागोराव शिंदे पळसपुरकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील पत्रकारितेच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
या पुरस्कारामुळे हिमायतनगर तालुक्याच्या पत्रकारितेच्या क्षेत्राचा सन्मान उंचावला असून, त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेतल्याबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
