नांदेड | देवानंद गुंडेकर सरसमकर
भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाचे कार्याध्यक्ष मा. श्री. के. टी. आर. (के. टी. रामाराव) यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त धर्माबाद तालुक्यातील बाबळी बंधारा परिसरात ग्रीन इंडिया चॅलेंजच्या ९ व्या आवृत्तीचा महाराष्ट्रातून शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने एक हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले असून, आगामी काळात संपूर्ण मराठवाड्यात एक कोटी वृक्षारोपण करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प जाहीर करण्यात आला.
ग्रीन इंडिया चॅलेंजचे संस्थापक तथा माजी राज्यसभा खासदार संतोषकुमार जोगिनपल्ली यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपणासह वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले.
वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असमतोल लक्षात घेता केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून, लावलेल्या प्रत्येक रोपाचे संरक्षण आणि संवर्धन करणे हीच खरी पर्यावरण सेवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठवाडा हरित करण्याच्या उद्देशाने नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र बीआरएसचे समन्वयक बाबुराव कदम, सुधीर बिंदू (परभणी), रमा देवी, राघव सर, विश्वनाथ पाटील बन्नाळीकर, नागोराव पाटील रोशनगावकर, गणेश कदम, राजू पाटील शिंपाळकर, धनराज कदम, मिसाळे सर, सय्यद रियाज, संजय बिलोलीकर, नवीन पाटील बन्नाळीकर, प्रदीपकुमार जैन, रमेश घुलेकर, ॲड. गणेश जाधव, मोहमद मुजाहीद यांच्यासह परिसरातील पर्यावरणप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे मराठवाड्यात पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास चालना मिळणार असून, भविष्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून हरित मराठवाडा घडविण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
