हिमायतनगर :देवानंद गुंडेकर सरसमकर
मातोश्री जतनबाई रामसिंग शेखावत प्राथमिक/माध्यमिक वि.जा.भ.ज. आश्रमशाळा, हिमायतनगर येथील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह कथित प्रशासकीय अनियमिततेच्या प्रश्नावर आता आंदोलनाची भूमिका घेण्यात आली आहे. संबंधित तक्रारीवर अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याने दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी आश्रमशाळेसमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, नांदेड यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत व शाळेतील विविध प्रशासकीय बाबींविषयी तक्रार सादर करण्यात आली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यालयाकडून पत्र क्र. २३७८ दि. १६/०७/२०२६ अन्वये खुलासा व अहवाल मागविण्यात आला; मात्र प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली नाही, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर आज नांदेड येथील सहाय्यक आयुक्त कार्यालयात नागोराव शिंदे पळसपुरकर, गंगाधर गायकवाड दिघीकर व देवानंद गुंडेकर सरसमकर यांनी भेट देऊन आमरण उपोषणाचे निवेदन सहाय्यक आयुक्त सचिन खुणे यांच्याकडे सादर केले.
यावेळी निवेदनकर्त्यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असून, प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षित व योग्य शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली.
दरम्यान, सहाय्यक आयुक्त सचिन खुणे यांनी स्वतः आश्रमशाळेला भेट देऊन सात दिवसांच्या आत चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र चौकशी व कार्यवाहीबाबत ठोस निर्णय होईपर्यंत दि. १४ ऑगस्ट रोजी नियोजित आमरण उपोषणाचा निर्णय कायम असल्याचे निवेदनकर्त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाकडे आता प्रशासनासह नागरिकांचे लक्ष लागले असून, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
