महसूल दिनानिमित्त अमोल कदम यांचीउत्कृष्ट महसूल प्रशासन सेवेबदल; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते गौरव

हिमायतनगर : देवानंद गुंडेकर सरसमकर

महसूल विभागात कर्तव्यनिष्ठा, कार्यतत्परता आणि प्रशासकीय जबाबदारीची प्रभावीपणे अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महसूल दिनानिमित्त गौरव करण्यात येतो. याच उपक्रमांतर्गत हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारी सज्जाचे कार्यरत तलाठी अमोल गुलाबराव कदम यांच्या उल्लेखनीय महसूल प्रशासन सेवेची दखल घेण्यात आली असून, नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (भा.प्र.से.) यांच्या हस्ते त्यांना गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.


महसूल विभाग हा शासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा मानला जातो. जमीन महसूल, सातबारा व फेरफार नोंदी, विविध महसूलविषयक दाखले, शासकीय योजनांची अंमलबजावणी, शेतकरी व नागरिकांच्या महसूलविषयक अडचणींचे निराकरण तसेच शासनाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यामध्ये तलाठी स्तरावरील कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.
कामारी सज्जात कार्यरत असताना अमोल गुलाबराव कदम यांनी शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या महसूलविषयक कामांना प्राधान्य देत कर्तव्यनिष्ठपणे सेवा बजावली. महसूल प्रशासनातील जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्याची प्रशासनाने विशेष दखल घेतली.


महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने महसूल प्रशासनात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी महसूल दिनानिमित्त गौरविण्यात येते. त्यानुसार दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात अमोल गुलाबराव कदम यांना गौरवपत्र प्रदान करण्यात आले.


या गौरवपत्रावर नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (भा.प्र.से.) यांची स्वाक्षरी असून, महसूल प्रशासनातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रशासनाकडून अभिनंदन करण्यात आले आहे.
अमोल कदम यांच्या या सन्मानामुळे हिमायतनगर तालुक्यातील महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या कार्याचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. सर्वसामान्य नागरिकांशी समन्वय साधत पारदर्शक, तत्पर आणि जबाबदार महसूल प्रशासनाची अंमलबजावणी करण्यासाठी अशा गौरवामुळे कर्मचाऱ्यांना निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!