हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:-
हिमायतनगर तालुक्यातील वडगाव तांडा येथे सोमवारी सकाळी शेतात काम करत असताना 28 वर्षीय नवतरुण शेतकरी उल्हास अनिल राठोड यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. शेतात नियमित काम सुरू असताना हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हल्ल्यात उल्हास राठोड शेतकरी जखमी झाला असून त्यांनी प्रसंगावधान राखत बिबट्याचा प्रतिकार केला. त्यांच्या धाडसामुळे तो थोडक्यात बचावला.या घटनेनंतर नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
या अनपेक्षित हल्ल्यामुळे वडगाव तांडा परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, असून विशेषतः पहाटे व संध्याकाळी शेतात जाण्यासाठी अनेकजण धास्तावले आहेत. गावकऱ्यांनी वनविभागाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
घटना घडलेल्या परिसरात वनविभागाच्या पथकाने पाहणी केली असून बिबट्याचा ठावठिकाणा शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना सावधानगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
