हिमायतनगर शहरात विद्युत महावितरणचा गचाळ कारभार; तासन्तास सुरू लपंडाव

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:-

हिमायतनगर तालुक्यात विद्युत महावितरणच्या निष्काळजी कारभारामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. हिमायतनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून दिवसा-रात्र अनियमित वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू असून, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय तासन्तास वीज खंडित केली जात आहे.

अचानक जाणारी व येणारी वीज यामुळे नागरिकांच्या घरगुती उपकरणांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. व्यापारी वर्गाचे व्यवहार ठप्प होऊन आर्थिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण, अभ्यास व गृहपाठ या सगळ्यावर त्याचा विपरीत परिणाम दिसत आहे.

स्थानिक नागरिकांनी महावितरण अधिकाऱ्यांना अनेक वेळा तक्रारी केल्या असल्या तरी ठोस कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. “वीजपुरवठ्याचे वेळापत्रक स्पष्ट करावे, वारंवार होणारे ट्रिपिंग बंद करावे” अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, महावितरणकडून तांत्रिक बिघाडाचे कारण देण्यात येत असले तरी याबाबत योग्य नियोजन व तत्पर दुरुस्तीची कामे होत नसल्याबद्दल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी या गचाळ कारभारावर तातडीने अंकुश लावण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!