हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:-
हिमायतनगर तालुक्यातील सर्व ग्रामीण भागांमध्ये बिबट्याचा वावर वाढत असल्याचे निदर्शनास येत असून, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या उपवन संरक्षण वन विभाग, नांदेड यांच्या वतीने नागरिकांसाठी विशेष सतर्कतेच्या सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील विविध गावांमध्ये बिबट्याच्या हालचाली आढळून येत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
वन विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, शेतकऱ्यांनी रात्री शेतात पाणी देण्यासाठी जाताना एकटे न जाता समूहाने जावे. हातात काठी ठेवावी तसेच मानेभोवती चाळीचे कापड बांधावे. मोबाईलवर गाणी, आवाज करणारी साधने वाजवत जाण्याचा सल्ला देण्यात आला असून त्यामुळे बिबट्यापासून संरक्षण होण्यास मदत होईल. वनक्षेत्र किंवा गावाजवळील उघड्यावर शौचास जाणे धोकादायक असल्याचेही वन विभागाने स्पष्ट केले आहे.
शाळकरी मुलांनी समूहाने शाळेत ये-जा करावी व पालकांनी मुलांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बिबट्याबाबत अफवा, बनावट फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करू नयेत, असेही वन विभागाने बजावले आहे. रात्री घरांचे दरवाजे नीट बंद ठेवावेत, अंगणात किंवा घराबाहेर झोपणे टाळावे तसेच लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना रात्री एकटे बाहेर जाऊ देऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पाळीव जनावरांना चांगल्या प्रकारे बंदिस्त गोठ्यात ठेवून गोठ्यात प्रकाशाची व्यवस्था करावी. कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास भटकी कुत्री वाढतात व त्यामुळे बिबट्याचे आकर्षण वाढते, याकडेही नागरिकांनी लक्ष द्यावे. अचानक बिबट्या समोर आल्यास घाबरून न जाता उभे राहून दोन्ही हात वर करून मोठा आवाज करत हळूहळू मागे सरकावे व त्याला मोकळा मार्ग द्यावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
बिबट्या किंवा इतर हिंस्र प्राणी दिसल्यास नागरिकांनी तात्काळ टोल फ्री क्रमांक 1926 वर किंवा स्थानिक वनकर्मचारी व वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी सतर्क राहून वन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन हिमायतनगरचे वनपरिक्षेत्र वनअधिकारी मंगेश पाटील यांनी केले आहे.
