हिमायतनगर प्रतिनिधी —
हिमायतनगर तालुक्यातील सर्वात मोठा म्हणून ओळखला जाणारा सुना सिंचन प्रकल्प गेल्या सात वर्षांपासून बंद पडल्याने मौजे वडगाव (ज) येथील शेतकरी अक्षरशः पाण्यावाचून तहानले आहेत. कॅनॉलमध्ये मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ, दुरुस्तीची कामे आणि पाटबंधारे विभागाचे निष्क्रिय धोरण यामुळे 2018 पासून आजतागायत या प्रकल्पातून पाणी सोडण्यात आलेले नाही. परिणामी सुमारे 50 एकर कृषी जमीन सिंचनाअभावी वाळवंटासारखी पडून आहे.
गावातील सुज्ञ नागरिक प्रकाश हरिश्चंद्र ताडकुले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, “आमदार, खासदार, तहसीलदार, जिल्हाधिकारी अशा सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन देखील काहीच न्याय मिळाला नाही. 2024 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतरही प्रत्यक्षात कामाला सुरुवातच झाली नाही. पाटबंधारे विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक या प्रकल्पाकडे दुर्लक्ष करत आहेत. वर्षातून एकदाही प्रकल्प पाहणीस येत नाहीत,” अशी तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली.
सिंचनासाठी पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे पिके जळत आहेत. खर्च, कर्ज आणि आर्थिक घसरणीच्या गर्तेत शेतकरी सापडले आहेत. सुना प्रकल्प कार्यान्वित झाला तर तालुक्यातील मोठ्या प्रमाणातील शेतीला जीवदान मिळेल, रोजगार टिकेल आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
गेल्या सात वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पातील कॅनॉलमधील गाळ तात्काळ काढून कॅनॉल दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घ्यावे व शेतकऱ्यांना सिंचन पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी ठाम मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. आता प्रशासन जागे होते का, की शेतकरी यापुढेही पाण्याविना त्रस्त राहणार? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
