हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ येथील दलित वस्तीतील सिमेंट रोडचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. या कामामध्ये ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मिलीभगत असून जाणूनबुजून निष्काळजीपणा केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
दलित वस्तीच्या विकासासाठी मिळालेल्या निधीतून करण्यात येणारे हे काम दर्जाहीन होत असून, संबंधित निधी इतर ठिकाणी वळवल्याचीही चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. सिमेंट रोड बांधकाम साहित्याची निकृष्ट गुणवत्ता, मजबुतीचा अभाव, तसेच आवश्यक तांत्रिक निकषांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
यामुळे या गावातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून संबंधित अधिकाऱ्यांकडून या कामाची चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, उच्चाधिकार्यांनी तातडीने दखल घेऊन दर्जेदार काम करावे, अन्यथा सावधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे गावकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
