हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:-
हिमायतनगर तालुक्यातील सरसम बु जिल्हा परिषद सदस्य पदासाठी कु. वैष्णवी दामोदर काळे या प्रमुख दावेदार म्हणून पुढे सरसावल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून सरसम बु जिल्हा परिषद गटातून त्यांना सदस्य पदासाठी संधी मिळण्याची दाट शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे.
वाशी येथील शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते व खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे खांदे समर्थक असलेले दामोदर मारोती काळे यांच्या कन्या असलेल्या कु. वैष्णवी काळे यांचे कार्यकर्त्यांमध्ये मजबूत जनाधार असून तरुण नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. पक्ष संघटनेत सातत्याने कार्यरत राहून त्यांनी ग्रामीण भागातील अनेक प्रश्नांवर लक्ष केंद्रीत केले आहे.
या पार्श्वभूमीवर सरसम बु जिल्हा परिषद गटात त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले. कु. वैष्णवी काळे सदस्य पदावर विराजमान झाल्यास स्थानिक विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
