हिमायतनगर:- देवानंद गुंडेकर
हिमायतनगर तालुक्यातील पारवा (बु) व मोरगाव या गावांमध्ये मागील पाच वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. विकास कामे प्रत्यक्षात न करता केवळ बिल उचलून निधी लाटल्याचा आरोप सरपंच व ग्रामसेवकांवर करण्यात येत आहे.
या कथित घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सुरज बोने हे गेल्या दोन दिवसांपासून तहसील/कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र उपोषणाचा दुसरा दिवस उजाडूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या उपोषण कर्त्याला गावातील काही पदाधिकाऱ्यांकडून धमकावले जात असल्याचे आरोपही पुढे येत आहेत, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घोटाळ्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत.पारवा (बु) व मोरगाव येथे झालेल्या सर्व विकास कामांची तात्काळ चौकशी करून संबंधित सरपंच, ग्रामसेवक व इतर दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी सुरज बोने यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
