जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या दिनदर्शिकेचे दिमाखात विमोचन


नांदेड प्रतिनिधी:-

राहुल कर्डीले जिल्हाधिकारी यांच्या शुभहस्ते राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या दिनदर्शिकेचे दिमाखात विमोचन करण्यात आले. पत्रकारिता, प्रशासन आणि समाज यांच्यातील समन्वय अधिक दृढ करणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


या कार्यक्रमास राज्य मराठी पत्रकार परिषदचे केंद्रीय संचालक श्री. राजकुमारजी बिर्ला, अभियंता (Er.) संदीप महाजन, मराठवाडा सचिव श्री. प्रदीपकुमार जैन, मराठवाडा विभाग अध्यक्ष सौ. उज्वला गुरसुडकर तसेच नांदेड जिल्हाध्यक्ष सौ. किर्ती पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय स्थानिक पत्रकार, पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


विमोचनप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी पत्रकारितेची समाजघडणीतली भूमिका अधोरेखित केली. “लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची जबाबदारी मोठी असून, सत्यनिष्ठ, निर्भीड व सामाजिक बांधिलकी जपणारी पत्रकारिता ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी नमूद केले. प्रशासन आणि पत्रकार यांच्यात सकारात्मक संवाद राहिल्यास जनहिताचे प्रश्न प्रभावीपणे सोडवता येतात, असेही त्यांनी सांगितले.


केंद्रीय संचालक श्री. राजकुमारजी बिर्ला यांनी राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांची माहिती देत पत्रकारांच्या कौशल्यविकास, प्रशिक्षण आणि संघटनात्मक बळकटीकरणासाठी परिषद सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. मराठवाडा सचिव श्री. प्रदीपकुमार जैन व विभाग अध्यक्ष सौ. उज्वला गुरसुडकर यांनी पत्रकारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.


कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, सौहार्दपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!