अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या पळशीकर कन्स्ट्रक्शन विरुद्ध 25 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण..

हिमायतनगर प्रतिनिधी —

हिमायतनगर तालुक्यातील अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या पळशीकर कन्स्ट्रक्शन विरुद्ध 25 फेब्रुवारी रोजी अमर उपोषणास बसणार असता श्री. गंगाधर गायकवाड व श्री. देवानंद गुंडेकर यांनी दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी पवना सजा अंतर्गत पळशीकर कन्स्ट्रक्शनकडून मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याची लेखी तक्रार तहसील प्रशासनाकडे सादर केली होती.

या उत्खननातील मुरूम टिपरद्वारे नविन आंदेगाव येथे बेकायदेशीररीत्या टाकण्यात येत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, दिनांक ०७/०२/२०२६ (शनिवार) रोजी दुपारी ठीक १:३४ वाजता घटनास्थळी टिपर क्रमांक MH 26 CH 2333 अवैध मुरूम वाहतूक करून खाली करत असताना तक्रारदार स्वतः उपस्थित होते. या वेळी त्यांनी व्हिडिओ व छायाचित्रांच्या स्वरूपात ठोस पुरावे संकलित करून तात्काळ संबंधित तलाठी व मंडळाधिकाऱ्यांना माहिती दिली होती.

तरीही आजपर्यंत सदर टिपर जप्त करण्यात आलेला नाही, तसेच टिपर मालक किंवा संबंधित ठेकेदारावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व गौण खनिज नियमांनुसार कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी मा. तहसीलदार मॅडम पल्लवी टेमकर यांनी पत्रक काढूनही प्रत्यक्षात ठोस कारवाई न झाल्याने तक्रारदारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

प्रशासनाकडून होत असलेली दिरंगाई म्हणजे अवैध उत्खननास अप्रत्यक्ष पाठबळ दिले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
न्याय मिळावा व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी देवानंद गुंडेकर व गंगाधर गायकवाड यांनी दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला असल्याची पूर्वसूचना प्रशासनाला देण्यात आली आहे. संबंधित टिपर तात्काळ जप्त करावा, टिपर मालक व ठेकेदारावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, आकारण्यात आलेल्या दंडाची पावती व केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल लेखी स्वरूपात द्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!