हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:-
आज दि. 10 मार्च 2026 रोजी ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे राज्यस्तरीय गुणवत्ता आश्वासन मापक (NQAS) कार्यक्रमांतर्गत समितीने भेट देऊन रुग्णालयातील विविध विभागांची सविस्तर पाहणी केली. ही पाहणी मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके सर व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
यावेळी नॅशनल अस्सेसर डॉ. अश्विनी वाघे मॅडम (नागपूर) व डॉ. प्रियंका साबळे मॅडम (कोल्हापूर) यांनी रुग्णालयातील विविध विभाग, रुग्णसेवा, दप्तर तपासणी, तांत्रिक बाबींची पूर्तता, स्वच्छता व व्यवस्थापन यांची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर तपासणी केली. तसेच रुग्णालयाच्या सेवेत अधिक गुणवत्तावाढीसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना देखील दिल्या.या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास वानखेडे सर यांनी रुग्णालयाच्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली, तर डॉ. शिवशंकर बुरकुले सर यांनी रुग्णालयातील विविध सेवांचे पॉवर पॉईंट सादरीकरण करून समितीसमोर माहिती मांडली.
सदर प्रक्रियेत जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. गुडे सर, डॉ. लोखंडे सर, डॉ. तिवारी मॅडम व डॉ. रुबी मॅडम यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
यावेळी रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, दंत शल्य चिकित्सक, इन्चार्ज सिस्टर, अधीपरिचारिका, औषध निर्माण अधिकारी, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, क्ष-किरण तंत्रज्ञ अधिकारी, सहाय्यक अधीक्षक तसेच वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.राज्य स्तरीय समितीच्या या पाहणीमुळे ग्रामीण रुग्णालयातील सेवा अधिक सक्षम व गुणवत्तापूर्ण करण्यास मदत होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
