हिमायतनगर :- देवानंद गुंडेकर सरसमकर
दि. २४ मार्च २०२६ – अवैध गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात हिमायतनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ४ लाख ८८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २३ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ९.२० वाजता पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, शहरातील शेख बाबा वालीसाहब परिसरात अवैध गुटखा व पानमसाल्याची साठवणूक करून विक्री सुरू आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला.
छाप्यात सैय्यद सत्तार सैय्यद खालिद (वय ४८, रा. पोटा बु., ता. हिमायतनगर, जि. नांदेड) याच्या ताब्यात मोठ्या प्रमाणात गुटखा व पानमसाल्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन ४,८८,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये विविध कंपन्यांचे पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश असून त्यात गोवा १००० पानमसाला, केसरयुक्त वज्री, जी.आय. जर्दा, विविध ब्रँडचे पानमसाले, सुगंधित तंबाखू तसेच “मस्तानी २१६” व प्रीमियम दर्जाचे तंबाखू उत्पादने यांचा समावेश आहे.
या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ५२/२५ नुसार भारतीय दंड संहिता कलम १२३, २७४, २७५ तसेच संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद दि. २४ मार्च २०२६ रोजी पहाटे करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार (भा.पो.से.), नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि हिमायतनगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अमोल भगत, सपोनि/विशाल वाठारे, पोहवा/1272, चालक श्रेणी पोउपनि/मिलींद कात्रे, श्याम नागरगोजे,
पोहवा/2204, बालाजी पाटील, मपोशि/3331, सपना सुर्यवंशी सर्व अधिकाऱ्यांच्या पथकाने छाप्यात सहभाग घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गुटखा व पानमसाल्यावर बंदी असतानाही काही ठिकाणी अवैधरीत्या साठवणूक व विक्री केली जात आहे. अशा प्रकरणांवर आळा घालण्यासाठी विशेष मोहिम राबवण्यात येत असून, पुढील काळातही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नागरिकांनी अवैध धंद्यांबाबत माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना कळवून सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
