मौजे हिमायतनगरात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात संपन्न..

हिमायतनगर :- देवानंद गुंडेकर सरसमकर..

हिमायतनगर येथे तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या शिबिराला शेतकरी, नागरिक व विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार पल्लवी टेमकर मॅडम होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी मंडळातील शेतकरी बांधव तसेच सर्वसामान्य नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रभावीपणे घ्यावा, असे आवाहन केले. महसूल विभागामार्फत मिळणाऱ्या विविध सेवा, दाखले, प्रलंबित फेरफार, सातबारा दुरुस्ती आदी कामांबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच भविष्यात तहसील कार्यालयात अशा प्रकारच्या कामांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विद्यापीठ पोखरणी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ देवाकांत देशमुख उपस्थित होते. त्यांनी खरीप हंगामात रासायनिक खतांचा योग्य वापर, माती परीक्षणाचे महत्त्व तसेच आधुनिक शेतीविषयक विविध बाबींवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.


यावेळी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, आयुष्यमान कार्ड, ई-राशन कार्ड, ७/१२ वाटप, कृषी अवजारे वाटप आदी उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय धोबे सरसमकर यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी बी. एम. चव्हाण यांच्यासह तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक व कोतवाल यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमासाठी नगरसेवक विठ्ठल ठाकरे, समद खान (माजी जिल्हा परिषद सदस्य), नगरसेवक प्रतिनिधी मेंडके, संतोष मुद्देवाड, राज्य मराठी पत्रकार परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष देवानंद गुंडेकर सरसमकर, जिल्हा उपाध्यक्ष राम चिंतलवाड, जिल्हा संघटक गंगाधर गायकवाड, पत्रकार सोपान बोंमपिलवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!