हिमायतनगर | प्रतिनिधी:- गंगाधर गायकवाड दिघीकर
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हिमायतनगर तालुक्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या 50 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांच्या प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी विशेष ग्रामसभांमध्ये आरक्षण सोडत काढण्यात येणार असून या प्रक्रियेस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ग्रामसभेची सूचना 8 जून 2026 रोजी देण्यात येणार आहे. त्यानंतर 8, 9, 10, 11 व 12 जून 2026 रोजी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार असून तहसीलदारांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडणार आहे.
या सोडतीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तसेच सर्वसाधारण महिला या प्रवर्गांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. आरक्षण सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप तयार करून जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर 19 जून 2026 रोजी प्रारूप आरक्षण प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर नागरिकांना आरक्षणाबाबत हरकती व सूचना सादर करण्याची संधी देण्यात येणार असून 19 जून ते 25 जून 2026 या कालावधीत हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. प्राप्त हरकतींवर उपविभागीय अधिकारी विचार करून आपला अभिप्राय सादर करतील.
यानंतर अंतिम आरक्षण अधिसूचनेला जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर 10 जुलै 2026 रोजी अंतिम प्रभाग आरक्षण प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार असून पुढील निवडणूक कार्यक्रमाच्या दृष्टीने प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे.
तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी सांगितले की, ग्रामपंचायत स्तरावरील आरक्षण प्रक्रिया ही लोकशाही व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाची बाब असून ती पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे. संबंधित ग्रामपंचायतीतील नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच इच्छुक उमेदवारांनी विशेष ग्रामसभांना उपस्थित राहून आरक्षण सोडतीची प्रक्रिया प्रत्यक्ष पाहावी. त्यामुळे प्रक्रियेबाबत कोणताही संभ्रम राहणार नाही आणि पारदर्शकता अधिक बळकट होईल.
हिमायतनगर तालुक्यातील 50 ग्रामपंचायतींसाठी होणाऱ्या या आरक्षण सोडतीकडे संभाव्य उमेदवार, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच नागरिकांचे विशेष लक्ष लागले असून आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
