हिमायतनगर : देवानंद गुंडेकर सरसमकर
तालुका कृषी अधिकारी कार्यालय, हिमायतनगर यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगाम २०२६ पूर्व जनजागृती मोहिमेअंतर्गत सरसम बु येथे शेतकऱ्यांना हवामान बदल, एल निनो व ला निना परिस्थिती, पिक नियोजन तसेच आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना हवामानावर आधारित शेती नियोजन, पाणी व्यवस्थापन, खतांचा संतुलित वापर, मृदा परीक्षणाचे महत्त्व तसेच खरीप हंगामात घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. गावातील प्रमुख ठिकाणी कृषी विषयक माहिती फलक प्रदर्शित करून जनजागृती करण्यात आली.
या मोहिमेच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी सहाय्यक एम. एस. काळे सर व गुहाडे सर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सरसम बु येथील स्थानिक नागरिक साईदीपक मोरे, तेजस मिराशे आणि सुरेश नरवाडे यांनीही सक्रिय सहभाग नोंदवत शेतकऱ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सहकार्य केले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या या उपक्रमाचे स्वागत केले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर योग्य पिक नियोजन व शास्त्रीय शेती पद्धतींचा अवलंब केल्यास उत्पादनात वाढ होऊन आर्थिक फायदा होईल, असा विश्वास कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
खरीप हंगामाच्या तयारीसाठी अशा प्रकारच्या जनजागृती मोहिमा शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून, कृषी विभागाच्या या प्रयत्नांचे परिसरातील शेतकऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.
