हिमायतनगर :- देवानंद गुंडेकर सरसमकर
हिमायतनगर येथील मातोश्री जतनबाई रामसिंग शेखावत प्राथमिक/माध्यमिक वि.जा.भ.ज. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, प्रशासकीय अनियमितता आणि कथित निष्काळजीपणाबाबत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, नांदेड यांच्याकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनात शाळेतील अनेक शिक्षक व वस्तीगृह अधीक्षक मुख्यालयी राहत नसल्याने विद्यार्थ्यांवर योग्य देखरेख होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच शाळेत कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक आणि नियमित मुख्याध्यापक नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, काही विद्यार्थी परवानगीशिवाय वसतिगृहाबाहेर जात असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना दर्जेदार व पुरेसे भोजन मिळत नसल्याबाबत पालकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच दि. ४ जुलै रोजी काही विद्यार्थिनी शाळेबाहेर गेल्यानंतर बसच्या धडकेपासून थोडक्यात बचाव झाल्याची घटना घडल्याने पालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणाची तक्रारदारांच्या उपस्थितीत सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात,
असे निवेदनकरते नागोराव शिंदे पळसपुरकर, देवानंद गुंडेकर सरसमकर, गंगाधर गायकवाड दिघीकर यांनी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, १० दिवसांच्या आत योग्य कारवाई न झाल्यास सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, नांदेड कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
