हिमायतनगर | देवानंद गुंडेकर सरसमकर
हिमायतनगर तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागामार्फत करण्यात आलेल्या वृक्षलागवड मोहिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील पंधरा दिवसांपासून तालुक्यात पावसाचा थेंबही पडलेला नसताना सवना, सिरंजणी, पळसपूर आणि हिमायतनगर परिसरात लावण्यात आलेल्या रोपांपैकी सुमारे ५० टक्के रोपे पाण्याअभावी वाळल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केला आहे. तसेच अनेक ठिकाणी शेकडो रोपे उघड्यावर फेकून दिल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वृक्षलागवडीनंतर रोपांचे संगोपन, नियमित पाणीपुरवठा आणि संरक्षणाची जबाबदारी संबंधित विभागाची असताना प्रत्यक्षात त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शासनाच्या निधीतून लावण्यात आलेली रोपे अल्पावधीतच वाळल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
नागरिकांच्या आरोपानुसार, कडक उन्हाळ्यात आणि पावसाची कोणतीही खात्री नसताना वृक्षलागवड करण्यात आली. मात्र, त्यानंतर रोपांना पाणी देण्यासाठी किंवा त्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे ही मोहीम पर्यावरण संवर्धनासाठी होती की केवळ कागदोपत्री काम पूर्ण करून निधी खर्च दाखविण्यासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
याशिवाय, वृक्षलागवडीची प्रत्यक्ष पाहणी होत नसल्याचा तसेच काही कामे खासगी व्यक्तींकडून करून घेत शासन निधीच्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून प्रत्यक्ष पंचनामा करण्यात यावा, तसेच शासन निधीचा गैरवापर झाल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी व जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, एकीकडे वृक्षतोड सुरू असताना दुसरीकडे शासनाच्या निधीतून लावलेली रोपे जगविण्यात अपयश येत असल्याने पर्यावरण संवर्धनाच्या उद्दिष्टालाच धक्का बसत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. वृक्षलागवडीसाठी मंजूर झालेला निधी, लावण्यात आलेल्या रोपांची संख्या, सध्या जिवंत असलेल्या रोपांची संख्या, वाळलेल्या रोपांचे प्रमाण तसेच संगोपनासाठी झालेला खर्च याची माहिती सार्वजनिक करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
