हिमायतनगर प्रतिनिधी :-देवानंद गुंडेकर सरसमकर
हिमायतनगर तालुक्यातील खैरगाव परिसरात पळशीकर गुत्तेदाराकडून क्रशरसाठी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दगड उत्खनन सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित उत्खननाकडे महसूल प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचीही चर्चा परिसरात सुरू असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठिकाणी आवश्यक परवानग्या नसतानाही मोठ्या प्रमाणात दगड उत्खनन सुरू असल्याचा दावा केला जात आहे. याबाबत वारंवार तक्रारी होऊनही महसूल प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
यामुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून, महसूल प्रशासन आणि संबंधित गुत्तेदार यांच्यात काही संगनमत आहे का, असा सवाल काही नागरिक उपस्थित करत आहेत.
स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच अवैध उत्खनन तात्काळ बंद करावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा ही देण्यात आला आहे.
