हिमायतनगर:- देवानंद गुंडेकर सरसमकर
हिमायतनगर तालुक्यातील टेंभी येथे सामाजिक वनीकरण विभागामार्फत करण्यात आलेली वृक्षलागवड आणि त्यानंतरचे संगोपन हे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आदर्शवत ठरत असल्याचे संयुक्त पाहणीत स्पष्ट झाले. मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारलेली असतानाही बहुतांश रोपे हिरवीगार व सुस्थितीत असल्याचे पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
दि. २१ जुलै रोजी सामाजिक वनीकरण विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी पाटील, वनविभागाचे अधिकारी एन. के. सुरनर, हिमायतनगर वन परिक्षेत्र अधिकारी मंगेश पाटील, मारोती गायकवाड, राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र राज्यचे नांदेड जिल्हाध्यक्ष देवानंद गुंडेकर सरसमकर, नांदेड जिल्हा सहसंघटक गंगाधर गायकवाड दिघीकर तसेच परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत वृक्षलागवडीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
पाहणीदरम्यान प्रत्येक रोपाची वाढ, संरक्षणासाठी करण्यात आलेली उपाययोजना, नियमित पाणीपुरवठा आणि देखभाल याची सविस्तर माहिती घेण्यात आली.
पावसाचा दीर्घ खंड पडूनही रोपांचे संगोपन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोपे तग धरून असल्याचे दिसून आले. त्यामुळे सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यपद्धतीचे उपस्थितांनी कौतुक केले.
“फक्त वृक्षलागवड करून थांबणे नव्हे, तर प्रत्येक रोप जगवणे हीच खरी पर्यावरण सेवा आहे,” अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. टेंभी येथील हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो, असे मत नागरिकांनी नोंदविले.
पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने सामाजिक वनीकरण विभागाने केलेले नियोजन, जबाबदारीने केलेले संगोपन आणि रोपे जिवंत ठेवण्यासाठी घेतलेले परिश्रम यामुळे टेंभी येथील वृक्षलागवड यशस्वी ठरत असून विभागाच्या कार्याचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
